Showing posts with label chaityabhumi. Show all posts
Showing posts with label chaityabhumi. Show all posts

मी बाबासाहेब बोलतोय


"चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय"... 

चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय, मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदूधर्मात मरणार नाही अशी घोषणा येवले नाशिक मुक्कामी १९३५ साली करून धर्म वेड्या काल्पनिक दगडांच्या मेंदूत
सडलेल्या,जातिभेदाचा उच्छेद मांडणाऱ्या मनुवादी विचारांना लाथाडून रंजल्या गंजल्या उपेक्षित
मागासलेल्या समाजाला समतेच्या मार्गावरून चालणारा बौद्धधम्म रक्तरहित क्रांती करून १४ ऑक्टोंबर १९५६
दिला. तो महामार्ग निर्माण करण्यासाठी 
मी घोषणा केली होती की "मी सारा भारत बौद्धमय करीन " शेवटचे दोन दिवस :बुद्ध आणि धम्म" ग्रंथावर शेवटचा हात डोळे फिरवता फिरवता झोपेतच काळाने अचानक घाला घातला व माझं महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे राहत्या घरी झालं.

नागभूमीत अर्थात नागपूर या ठिकाणी माझ्या समकालीन समाजातील अनुयायी यांना दीक्षा दिली.
त्या ठिकाणी काही तास ठेवून माझं 'शव' विमानाने मुंबईत आणलं गेलं.लाखो अनुयायी माझ्या प्रेमापोटी रस्त्याच्या दुतर्फा रांगेमधून ओक्साबोक्सी रडत होती. अश्रू देखील आवरत नव्हते. एवढे अतोनात प्रेम
करीत राजगृह येथून माझ्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली .
माझ्या शवाला अखेर अग्नी देण्याकरिता सुद्धा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या भूमी पुत्राला भारताच्या अधिनायक,घटनाकाराला जागा देण्याची असमर्थता दाखविली अर्थातनाकारली अखेर गुहागर
तालुक्यातील रत्नागिरी जिल्यातील सुपुत्र माझेच सहकारी मित्र बहुजन समाजातील (भंडारी) नेते सी. के.
बोले यांच्या मालकीची जागा क्षणाचा विचार न करता माझ्या अखेरच्या शरीराला सरणावर
जाळण्यासाठी सरण रचण्याची सूचना केली व मला अनुयायी यांनी सरणावर चिता रचून माझा पुत्र यशवंत
यांनी सर्वांच्या साक्षीनं बुद्धधम्माला अनुसरून अग्नी दिला.मी शांत गाढनिद्रेत आसमंतात
विरघळून गेलो.काही दिवसांनी माझ्या आठवणीचा ठेवा म्हणून माझ्या पुत्रांन व समाजातीलपुढारी, विचारवंत
मंडळीनी माझ्या अस्थींच्या माध्यमांतून "चैत्यभूमी " ची संकल्पना उभी केली.
आज जगाच्या, भारताच्या पाठीवर 'चैत्यभूमी ' ही माझ्या नावानं अस्तित्वात असून ओळखली जाते..मला जाऊन ५८ वर्ष लोटली. अनेक अनुयायी मला वंदन,अभिवादन करण्यासाठी येतात.त्यातील काही अगदी निस्सीम हृदयातील आतील कोपऱ्यातील ठेवणीतील जागा माझ्यासाठी कोरून ठेवली आहे.ते अनुयायी जगाच्या,भारताच्या विविध कानाकोपऱ्यातूनयेतात तासंतास रांगेत उभे राहूनमला नद्मस्तक होतात.मात्र
काही जण येतात ते मात्र स्वतःचा स्वार्थसाधण्यासाठी स्वतःचा आर्थिकहेतू साधण्याकरिता येतात.येऊन
काही काळ केवळ स्वतःची दुकाने मांडून उभे राहून जातात .अनुयायी हो,मी आपल्यास सांगितले होते कि,
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी जे जीवनात सोसून आपल्याकरिता महामार्ग
देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रथाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करा परंतु तसे करताना होताना काहीच दिसत नाही मला आता काही अनुयायी 'देव'मानायला लागलेत.माझ्या नावावर आर्थिक प्राप्ती करून स्वतःचा उदर निर्वाह करायला लागलेत.माझ्या नावाचा गैरवापर करून या डॉ.बाबासाहेबाला,देशाच्या
घटनाकाराला,जगाच्या पाठीवर असलेल्या बुद्धीवांताला केवळ मागासलेल्या,उपेक्षित लोकांचा मसीहा म्हणून ओळखू जाऊ लागले आहे. याला कारणीभूत जबाबदार कोण?अरे गद्दरानो तुम्हीच? आपण सर्व
येता स्मृतिदिनाला अर्थात मला अभिवादन वंदन करण्यासाठी?मात्र कसे येताहो, हसत खेळत बागडत,
जत्रेच रूप देत नको ते उद्योग करता जर माझ्या स्मृतिदिनाला जत्रेच स्वरूपआणत असाल तर याद राखा. यापुढे पाय पवित्र चैत्यभूमीवर ठेवूच नका.मी आपला उद्धारकर्ता आहे. असे आपणास उमजून माहित
असताना देखील एक दुःखाचा दिवस मौन बाळगून गांभीर्य ओळखून शांत पायाकडेअर्थात खाली बघून चालू शकत नाही का?कसले हो, भीमसैनिक लाज वाटायला हवी ?तुम्हाला शरम वाटली पाहिजे? मला केवळ
तुम्ही आपलाच 'बाबा' म्हणून सीमित करून टाकलाय. आमचा बाबासाहेब? आमचा आंबेडकर ?एकच साहेब
बाबासाहेब? काय चाललाय काय?अरे माझ्या लेकारानो, मी आपला आहेच. परंतुआधी या भारताचा,या जगाचा आहे हे जाणून घ्या.ज्या भारताची राज्यघटना लिहिली.या जगाने दोनशेवर्षाच्या इतिहासातबुद्धीचा एकमेव महामेरू म्हणून गौरव केला. त्याचा अशा प्रकारे ६डिसेंबरला अर्थातमाझ्या स्मृतीदिनाला महाजत्रेच,तीर्थ
यात्रेच रूप आणता. व माझ्या नावाला हसण्याची वेळमनुवादी लोकाकडूनआणता.तुम्हाला गायीच्या पाडसाप्रमाणे हंबरणे सुद्धा त्याकाळी कठीण होते. तिथेवाघासारखी डरकाळी फोडण्यासाठी तुम्हाला माणसात
आणले .पण आजही ६ डिसेंबरला स्मृतिदिनाला डरकाळी काय मोठयान खिदलताय काय?मोठयाने हसताय काय?एका दिवसाला आपल्या तोंडाला आवर घालू शकत नाही.कशाला माझा स्मृतीदिवस साजरा करता आहात?.या पुढे थांबा.करूच नका ?अनुयायीहो,अरे तुमच्या स्वतःच्या घरी जेंव्हा स्वतःचआई, बाप,नातेवाईक मरण पावल्यावर स्मृतिदिन साजरा करताना मोठयाने हसणेखिदळणे, लाऊड स्पीकर लावूनगाणी लावता काय?जत्रा भरवता काय? नाही ना ? मगबौद्ध धम्माच्या रीतीरीवाजानेतो विधी पार पाडता.अरेमाझ्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नकरता तुम्हाला माणसात आणूनसमानता निर्माण करू दिली.समतेच्या महामार्गावर आणून सोडले.आणि ६डिसेंबरला माझ्या स्मृतीदिनाला,ज्यांना मी म्हटले होतेकी,माझ्या एक शाहिराच गाणं हेमाझ्या दहा भाषणा बरोबर आहे.असे असताना या दिवशी महाराष्ट्रातीलसर्वच आघाडीचे शाहीर, गायक शिवाजीपार्कवर स्वतःचगाण्यांनाच दालन नको तेवढ्या आवाजात वाजत गाजत उभं करून मला चैत्यभूमिवर अर्थात सरणावर जाळण्याकरिता ठेवला होतं अर्थात कायमचाच गाढनिद्रिस्त अवस्थेत
झोपी गेलो होतो ती जागा सुद्धा त्या आवाजानदुभंगली जात आहे. एवढा कर्कश आवाज त्या ठिकाणी होतो याला कोणतेस्वरूप म्हणावे? हा आनंदाचा दिवस की दुःखाचा दिवस सांगा ना?ही तर जत्राच भरली आहे ,तमाशाचहोतो आहे.अगदी सहज वाटते.एखाद्याने विचारले की हा कोणता दिवस आहे हो, आपण काय , कशाकरिता करीत आहात तर त्याचा द्वेष, राग करून म्हणतोस की,आम्ही बाबासाहेबांना अभिवादन
वंदन करीतआहोत,करायला आलो आहोत. म्हणून भोंगा गाणी,भाषण करूनसाजरा करीत आहोत.अरे
माझी जयंती १४ एप्रिलला असते, ६डिसेंबरला नाही.अनुयायीहो, इतर भारतीयलोकांना माझ्या विज्ञान
विचाराला, स्मृतीदिनाला वंदनकरायला यायचे असते. मात्र आपणचअसे प्रकार करून माझ्या नावाला,
बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच केवळ'बाबा' म्हणून जगजाहीर करून मोकळेचकेलेआहे .कृपया मानसिकता बदला अन्यथा मनुवादी विषमतावादी जावूद्या हो,परंतु मला शंका आहेच येत्याकाळातआपलेच स्वतःला बौद्ध ब्राम्हणसमजणारेसुद्धा माझ्या स्मृती दिनाला येणारनाहीत . विचारकरा हा मांडलेला बाजार,जत्रेच स्वरूप बदलून काही तरी नाविन्यअर्थात मौन बाळगून स्मृती दिन साजरे करायचे असतात.तुम्ही आता मागासलेले नाहीत त्यातून बाहेर काढून तुम्हाला नवीन विचार दिले आहेत. त्याप्रमाणे वाटचाल करा, चाला वरसांगितल्या प्रमाणे स्वतःच्या आई वडिलांचे र बुद्धाला अनुसरून स्मृतीदिन साजरे करता तसाच माझा करा. बुद्ध वंदना घेऊनच.प्रथम गायक शाहीरओर्केष्ट्रा यांना ताळ्यावर आणून शांतता प्रस्थापित करा. एवढे दिवस सहन केले
आता माझी सहनशीलता संपलेली आहे .माझ्या नावावर आतापर्यंत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आर्थिक बाजू मजबूत केली आहे.करणार आहात व कराच. परंतु माझ्या स्मृतीदिनाला यासर्व प्रलोभन पासून एक दिवस तरी वंचित रहा. मौन, शांत येऊन वंदन करूनजा .आजपर्यंत स्मृतीदिनाला येणारा हा केवळ
खालच्या वर्गातील अनुयायी आहे.परंतु येणाऱ्या काळात माझ्या स्मृतीदिनाला येणारा अनुयायी हा प्रत्येक
वर्गातील असावा.तो येईल त्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील रहा ,शिस्थ बंधन नियम याचे पालन करून शिवाजीपार्कला अर्थात चैत्यभूमीचा परिसर हा शांततामय कसा राहील याचा शोध घ्या.
आजकाल काही सरकारी,नेते मंडळी माझ्या स्मृतीदिनाला माझ्या स्तुपावर आणि जमलेल्या अथांग जनसमुदायावर घिरट्या घालणाऱ्या छोट्या विमानातून पुष्पवृष्टी करीत आहेत हे अतिशय चुकीचे असून त्याला तीर्थस्थाननिर्माण करण्याचा षड्यंत्र राबविले जात आहे. त्यावर उपाय करा आणि त्यावर बंदी आणा.त्याचप्रमाणे मला अभिवादन करण्यासाठी येणारे स्वार्थी नेतेअभिवादनसभा या नावाखाली हसत खिदळतमनुवादी विचारांच्या लोकांना आणून समोर बसलेल्या अडाणी लोकांना नको ती आश्वासने देत भूलथाप्पा मारून नको ते विचार देवून समाजाला फसविण्याचे धोरण आखत आहेत. अशांना रोखूनमाझ्या विचाराने चालणारा समाज घडवा असे निक्षून सांगणारे तरुण घडवा ,जागृत ,उठावकरणारे तयार व्हा बदल नक्कीच होईल. स्मृतिदिन हा शिस्तबद्ध पद्धतीने घडविण्यास तुमच्या सारखा समर्थनीय तरुणच हवाच हे सर्व तुमच्याच हातात आहे.रक्त माझेच आहे ते केवळ रक्त वापरा नसा आपोआप तयार होतील. रक्ताभिसरण
झाल्याशिवाय राहणार नाही.अर्थात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.प्रथममाझ्या स्मृती दिनाला शाहीर,
गायक यांच्या आवाजाला शांत करा त्यांना शांतपणे स्वताच्या ध्वनिफितीचे विकण्यास मुभा द्या, प्रवृत्त करा ,नेत्यांची भाषणे माझ्या स्मृतीच्या दिवशी नकोच यासाठी प्रयत्न करा.त्यांना सांगा एकदिवसी मौन बाळगा. अभिवादन केवळ वंदन करून निघून जा.असा सांगणारा तरुण वर्ग निर्माण करा. नक्कीच बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे शांततेत माझा स्मृतिदिन पार पडेल.सुरवात करा मी नक्कीच तुमचा पालन उद्धार  कर्ता कायमचाच राहीन.
माझ्या स्मृतीदिनी अर्थात सहा डिसेंबर महापारीनिर्वान दिन महाराष्ट्रातील शाहीर, गायक , नेते  मंडळीं आणि अनुयायी आपण सर्व मोठ्या अभिमानाने अभिवादन करण्यासाठी येत  असता मी कायमचा सरणावर
निजलेला जगाचा महान बुद्धिवंत प्रकांडपंडित बोधिसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा मोठ्या बिरुदावल्या नावाच्या समोर आहेत. असे असताना मात्र हे ५ तारखे पासून लावलेल्या शाहिरांच्या गायकांच्या आणि मला अभिवादन  करण्याच्या नावाने नेत्यांच्या सभा यांचा ध्वनी जमीन हादरवणारा कर्कश
भोंग्याच्या आवाजाने स्वतःच मौन बाळगून उघड्या डोळ्याने चित्र बघून  मी सांगितल्या प्रमाणे
माझ्या नावाचा गजर करण्यापेक्षा स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी झटा.मला अशा तुमच्या किळसवाण्या प्रकाराने तुमचा तिरस्कार वाटायला लागलाय.माझे महापारीनिर्वान होऊन केवळ माझ्या नावाने गेली ५६ वर्ष अक्षरशा धुडघूस घालून समाज विखुरला गेला आहे.तुम्ही केवळ एक दिवस मौन बाळगून शांत राहवून अभिवादन करण्याची किमया साधू शकत नाहीत.हा शरमेने मान  खाली घालायला लावणारा प्रकार
नाही तर काय ? अनुयायीहो,या पुढे माझ्या निर्वाणदिनी चैत्यभूमीवर असे प्रकार होत असतील तर येऊच
नका. माझ्या नावावर हजारो रुपये कमवायचे असतील ,हिंदू धर्माला नाकारणारा मी अशा धर्माचे अनुकरण करून माझ्या महापारीनिर्वाना ला जत्रेचे महारूप देत धिंगाणा घालत असाल तर येऊच नका.मी झिजलो झटलो ते तुमच्या उद्धारासाठीच पण माझ्या नावाचा मेल्यानंतर कायमचा उद्धारच करून टाकला आहे.
माझ्या नावाने मनुवादी आधीच पिसाळलेला होता. आज माझ्या नावाचा तिरस्कार तुम्ही जास्त करून द्यायला लागले आहात.लक्षात ठेवा मला सीमित करू नका मी या देशाचा आहे या जगाचा आहे अशी माझी ओळख
असताना माझ्यावर मर्यादा टाकू नका .
माझ्या महापारीनिर्वाना ला येणारा अनुयायी हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून आपणास मी जाहीरपणे सांगितले आहे "मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटचा श्वास असे पर्यंत भारतीय आहे हे आपण
विस्र्वायला लावत आहात मला केवळ बौद्ध धम्मात सीमित करू नका तुम्हीच म्हणता ना महामानव
युगपुरुष जन्मतात ते कोणा एका धर्माचे ,जातीचे नसतात मग असे आपण का करीत आहात .मला मान्य आहे मी तुमचा मार्गदाता उद्धारकर्ता आहे मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे.त्याच बरोबर तुम्हीही स्वीकारला आहे .पण मी या भारताचा आधी नागरिक आहे अर्थात मी देशाचा भारतरत्न आहे. या जगाचा विश्वरत्न आहे.
याचा विसर तुम्हाला होता कामा नये .. माझे विचार इतरांना सांगून बुद्धाचा धम्म किती महान आदर्श
आहे. हे पटवून द्या तरच सारा भारत बौद्धमय होईल .परिवर्तन झाले की अवघा भारत माझ्या ६ डिसेंबर
अर्थात महापारीनिर्वान स्मृती दिनाला नद्मस्तक होण्यास येईल .त्याचवेळी चैत्यभूमीला खऱ्या अर्थाने
महत्व प्राप्त होईल .म्हणून' सीमेला सीमित करून ठेवण्यापेक्षा सीमेचे उल्लघन केल्याशिवाय त्या जागेला महत्व प्राप्त होणार नाही' . म्हणजेच बाबासाहेब हे केवळ बौद्ध, उपेक्षित मागासलेल्या समाजाचे नसून ते
काश्मीर ते कन्याकुमारी या अन्खंड भारताचे बाबा आहेत. हे जाणवून देण्याची जबाबदारी तरुण
हो तुमच्यावर आहे. 
जयबुद्ध जयभारत! 
लेखक : धम्मबांधव 
राजेश सावंत-
( चेअरमन - 'आसरा 'एज्युकेशन आणी सामाजिक संस्था). 

“चैत्यभूमी” नव्या क्रांतीचे एक विश्वकेंद्र

ज्या भूमीवर मानवाला मानवतेचे चैत्यन्य व स्फुलिंग मिळते,माणूस म्हणून समतेची मानवसेवा करायला प्रवर्ग होतो ती “चैत्यभूमी”. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दादर भागात विवेकवाद व  विज्ञाननिष्ठा जपण्याचा मंत्र देणारी चैत्यभूमी. एक अशी भूमी जिथे दरवर्षी देश विदेशाच्या काना-कोपर्‍यातून आलेले लाखो लोक एका अनन्यसाधारण व्यक्तीला लहान मुलापासून तर आबालवृध्दा पर्यंत पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून अगदी शिस्तीमध्ये गंभीर व भारदस्त मनाने आदरांजली वाहतात तर दुसरीकडे काही काळ स्तब्ध राहून निळ्याभोर समुद्राच्या लाटा आदरांजली वाहत असतात. त्यातच भारताच्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंकदुरूनच दर्शन घेत त्यांना सलाम मारीत असतो. 
जगातील एकमेव अशी व्यक्ती की जिच्यावर लाखो लोक स्तुतीसुमने वाहन्यासाठी एकत्र येतात, ती व्यक्ती म्हणजेडॉ.बाबासाहेब आंबेडकर. दादरच्या याच चैत्यभूमीवरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला ‘चैत्यभूमी’असे म्हणतात. ६ डिसेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती “जयभीम” चा नारा देत ‘बुध्दंम् शरणंम् गच्छामि’ च्या जयघोषात समर्पित होत असते. चैत्यभूमी आता केवळ भिमानुयायांच्या साठीचे आकर्षण केंद्र राहिले नसून ते बहुजनलाही वंदनीय झालेले आहे. देशविदेशातील अनेक मान्यवर मुंबईमध्ये येताच त्यांची पावले दादरच्या चैत्यभूमिकडे वळत असतात.
दादर परिसरातील प्रसिध्द पार्क म्हणजे “शिवाजी पार्क” होय. दरवर्षी ४ ते ६ डिसेंबर ह्या दिवसात शिवाजी पार्क हे “ज्ञानकेंद्र” बनलेले असते. डॉ. आंबेडकरांच्या समृद्ध वैचारिक वारशासोबतच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन विचारांचे प्रतिबिंब ठायी-ठायी उमटताना दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्व:साहित्यासोबतच इतर विद्वानांनी डॉ.आंबेडकर व त्यांच्या कार्यावर विविध भाषेतून केलेले भाष्य पुस्तकीरुपात बघायला मिळत असते. शेकडो पुस्तकांचे स्टॉल्स तसेच गीतांच्या सीडी जागोजागी दिसतअसतात. विविध संस्थांनी उभारलेल्या स्टॉल्समधून पत्रके व पुस्तिकाच्या माध्यमातून चैत्यभूमीवर येणा-यांना ज्ञानार्जीत करून माहितीपत्रकांचे विनामूल्य वाटप केले जाते. या ठिकाणी येणारा जनसमूह मूर्तीपूजक म्हणून येत नसतो तर तो  येथून विवेकवाद, वैज्ञानिक जाणीवा, मानवतावाद, बुद्धिनिष्ठ तर्क व सत्याचा अर्क तसेच समाजपरिवर्तनाच्या चळवळीसाठी नवे विचार व त्याचा प्रसार करण्याच बळ तो घेवून जात असतो. आजचा बहुजनवाद, मुलनिवासीवाद, सत्यशोधक, अंधश्रद्धा व धर्मांधभक्ती विरोध आणि ब्राम्हण्याविरुद्धची सत्यवादी चळवळ हे त्याचेच अपत्य आहे. 
शहरे व खेड्यातून डोक्यावर ओझे घेवून अनवाणी येणारे आबालवृध्द येतात तरी कशासाठी? असे आहे तरी काय या चैत्यभूमीवर? असा प्रश्न येथील प्रस्थापितांना नेहमी पडत असतो. या प्रस्थापितांना  विस्थापितांचे जीवन कसे कष्टमय व अन्यायकारक असते याची मुळातच जाणीव नसते. ते केवळ दुस-यांच्या दु:खावर आपले सुखवस्तू जीवन चैनीमध्ये जगत असतात. अशांना बाबासाहेब म्हणजे आपले शत्रूच वाटत असतात. ज्या आबालवृद्धांनी ज्यांच्यावर आपल्या निष्ठा अर्पण केल्या ते बाबासाहेब होते तरी कोण? बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केल तरी काय? असे प्रश्न प्रस्थापितांच्या नव्या पिढीसमोर जरूर निर्माण होत असतील? अशांना बाबासाहेब सांगणे हे सुध्दा फार गरजेचे असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखी युगायुगातून एखादीच निर्माण होणारी व्यक्ती असते. संसदेमध्ये श्रध्दांजली देतानानेहरू म्हणाले, हिंदू समाजावरचा कलंक धुवून काढण्यासाठी संसदेने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे परंतु समाजाच्या हाडामासी खोल रुजलेली रुढी केवळ कायद्याने पूर्णपणे नष्ट होत नसते. परंतु बाबासाहेबांच्या तीव्र विरोधामुळे लोकांची मने या प्रकाराविषयी जागरूक बनलेली होती. डाक्टरांनी सात कोटी अस्पृश्यात एक अणुशक्ती व उर्जा निर्माण केली. आचार्य अत्रे म्हणतात त्याप्रमाणे, बाबासाहेब म्हणजे बंड, त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्रमूठ, आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्द असलेली भीमाची गदा, आंबेडकर म्हणजे जातीभेद व विषमतेवर सोडलेले सुदर्शन चक्र, आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख, आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधा-याच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्द. बाबासाहेबांनी, तथागत बुद्ध, संत कबीर व म. फुले हे तीन गुरुच मुळी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदाचे थोतांड माजाविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. बाबासाहेब सत्तेच्या व धर्माच्या जुलुमाला कधीच शरण गेले नाहीत. शरणागती त्यांच्या रक्तातच नव्हती, मोडेन, मार खाईन पण वाकणार नाही, असी त्यांची जिद्द होती ती त्यांनी खरी करून दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही  हीन रीतीने वागवितो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे ते हिंदू धर्मियांना बजावून सांगत. माणसासारख्या माणसांना अस्पृश्य बनविणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार असे त्यांनी सनातनी हिंदुना छातीवर हात मारून सांगितले होते. बाबासाहेबांच्या याच करारीपनामुळे हिंदुना आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षा हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत असे वाटत असे. आजही हिंदुत्ववाद्यांना बाबासाहेब म्हणजे कोणीतरी भयंकर असेच वाटते.
आचार्य दोंदे बाबासाहेबांना श्रन्दांजली वाहतांना म्हणतात, “जागतिक कीर्तीचा विद्वान” हा महान सन्मान पदरी बांधून भारतामध्ये जन्मास आलेली महान व्यक्ती. या विद्वानाला सुध्दा अनंत हाल सोसावे लागले. खेड्यापाड्यात बॅरीस्टरचे काम करायला निघाले, तर प्रवासात पाणी कोणी द्यायचे नाही, टांगेवाला टांग्यामध्ये घ्यायचा नाही. स्पृश्य समाजापैकी एखादा दुसराच क्लायंट त्यांना लाभायचा. त्यांना शाळेमध्येही प्रवेश मिळेना. मिळाला तर वर्गाच्या दारात त्यांच्यासाठी निराळे बाक, संस्कृत शिकवायचे नाकारल्यामुळे पर्शियन शिकावे लागले. नोकरीत स्पृश्य शिपायाकडून अपमान असे अनेक अपमान पचवून ते बाबासाहेब झालेत. ३१ मे १९३६  रोजी मुंबईमध्ये “मुक्ती कोण पथे” या विषयावर भाषण झाले. ते एका सामाज क्रांतीकारकाचे भाषण होते. साधना साप्ताहिक म्हणते स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेबांना कट्टर हिंदुत्ववादी वगळता इतर समाजगटात मानसन्मान प्राप्त झाला होता.
बाबासाहेबांचे स्थान कसे उच्च कोटीचे होते हे विदेशी वृत्तपत्रांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून प्राप्त होते.  न्यूयार्क टाईम्स आपल्या भावना व्यक्त करताना लिहिते, डॉ. आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वतले. ते जगात सुप्रसिध्द होते. अस्पृश्य जगाचा धुरंधर म्हणून त्यांचा जगातील गौरव विशेष महत्वाचा होता. अस्पश्य समाजात जन्म घेतल्यानंतर त्यांना अत्यंत बिकट परीस्थितीमधून जगावे लागले. परंतु डॉ. आंबेडकरांनी या परिस्थितीलाही आव्हान दिले होते. नैसर्गिक व परिश्रमपूर्वक मिळविलेली बुद्धिमत्ता असल्यामुळे अशा परिस्थितीला कसे आव्हान देता येवू शकते? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डाक्टर आंबेडकर होत. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याचा सर्वोत्कृष्ठ उपाय कोणता? याबाबत मोहनदास के. गांधी यांचेसोबत आंबेडकरांचे मतभेद झाले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की, आंबेडकरांचा अस्पृश्यांचे प्रश्न सोडविन्याबाबतचा दृष्टीकोन गांधीपेक्षा अधिक कायदेशिरपणाचा होता. भारताच्या शासनाचा कायदेशीर पाया मुख्यत: डाक्टर आंबेडकर यांनी बसविला. भारतीय घटनेचे आंबेडकरच खरेखुरे शिल्पकार होते. आंबेडकर जगातील एक महान व्यक्ती होती. ते आपल्यासभोवार असलेल्या परिस्थितीतून व साधनातून उत्कृष्ट मार्ग शोधीत असत. त्यांचे गांधीबरोबर एकमत झाले नाही आणि त्यांनी नेहरुचे मंत्रिमंडळ केवळ मतभेदानेच सोडले. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने वैशिष्ठपूर्ण दर्जाच्या प्रथा पाडल्या होत्या. आणि त्या प्रथेनुसार आंबेडकर सतत वागले. त्यांच्या अनेक महान कार्यांपैकी काही कार्यांना फळे यावयास वेळ लागेल. मात्र आंबेडकरांचा प्रभाव हा अपुर्वपणे भारतावर पडलेला आहे. त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपण आहे. (न्यूयार्क टाईम्स, इंटरनशनल ८.१२.१९५६)
लंडन टाईम्स बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हणते, भारतातील सामाजिक व राजकीय घटनांच्या कोणत्याही इतिहासात आंबेडकराचे नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्माच्या जातीव्यवस्थेमुळे अपमानस्पद वागणूक मिळाली. तरीदेखील आंबेडकरांनी बहुमानाचा व नेतृत्वाचा मार्ग बरोबर काढला. ते शरीराने व बुद्धीने फार मोठे होते. निश्चय व धैर्य ही जणू त्यांच्या चेहऱ्यावर लिहिल्याप्रमाणे दुग्गोच्चार होत होती. त्यांनी तिन्ही खंडामध्ये अध्ययन करून ज्ञान मिळविले होते. अमेरिकेतील न्यूयार्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र याचा दीर्घ अभ्यास केला. त्यांनी बॉन युनिव्हर्सिटीत देखील अभ्यास केला. लंडनच्या स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. त्यांचा अभ्यास इंडिया ऑफीस मध्ये चालत असे. आंबेडकरांची बुद्धी व लेखणी कामात सतत गर्क असायची. “कांग्रेस व गांधीनी अस्पृशांचे काय नुकसान केले” या नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये आंबेडकरांच्या चळवळीची संपूर्ण कथा आहे. त्यांनी पाकीस्तानावर ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे रुपयाचा प्रश्न, भारतीय भांडवलाची वाढ व विकास अशा अनेक महत्वाच्या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत. भारताची घटना देखील त्यांच्या लेखणीतून तयार झाली. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यानी अंगीकारलेली कामे चालविली होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा अविष्कार म्हणजे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा केलेला स्वीकार होय. ( दिनांक: ०८.१२.१९५६) तर मँचेस्टर गार्डियन बाबासाहेबांचा धन्यवाद देताना म्हणते, भारतीय बिगर मुसलमान पुढा-यापैकी ज्या मोजक्या पुढा-यावर गांधीजीचा प्रभाव कधीच पडू शकला नाही त्यापैकी डॉ.आंबेडकर एक प्रमुख  होत. गांधीजींच्या विचारामुळे भारतातील जातीव्यवस्था तशीच पुढे सदासर्वकाळ राहील असे वाटत असे. हिंदू लोकांच्या हातात अस्पृश्य मानलेल्या समाजाचे भवितव्य सुरक्षित राहील असा आंबेडकरांना विश्वास वाटत नव्हता. हिंदुपैकी काहीजन तात्पुरते प्रगतीकारक व हितकारक असले तरी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांचे कल्याण त्यांचे हातून घडणार असे त्यांना सतत वाटत असे. म्हणूनच अस्पृश्य समाजाकरिता स्वतंत्र मतदार संघ असावा अशी अतिशय आग्रहाची मागणी आंबेडकरांनी केली होती. पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केल्यावर गांधीनी निकराचा उपवास आरंभला. डॉ. आंबेडकरावर गांधीच्या मित्राचे खूप दडपण आले व त्यामुळे आंबेडकरांना आपला मार्ग सोडणे भाग पडून गांधीचा जीव वाचविला. हिंदू लोकासबंधीचा आंबेडकरांना वाटणारा अविश्वास त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम राहिला. ते नुकतेच लाखो अनुयायांसह बौद्धजन बनले. अस्पृश्यतेविरुध्द आंबेडकरांनी प्रचंड लोकमत तयार केले, व त्या लोकमतामुळे, अस्पृश्यांच्या कल्याणाची दखल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर, नोकऱ्या व शैक्षणिक संस्था यामध्ये अस्पृश्य लोकांना खास व विशिष्ठ असे अधिकार प्राप्त झाले. (०७.१२.१९५६).
डाक्टर आंबेडकरांचे जीवन म्हणजे अखंड झगडा होता. अस्पृश्यतेचे चटके त्यांना लहानपणापासून खावे लागले. कुशाग्र बुद्धी असली तरी शाळेत, महाविद्यालयात, कोर्टात वा समाजात त्यांना अस्पृश्य म्हणून वागविले जात होते. सर्व प्रकारची लायकी व कर्तबगारी असतानाही केवळ जातीमुळेच आपणाला बाजूला सारले जात आहे. आपला अपमान होतो हे त्यांना समजत होते. माझ्याबाबतीमध्ये जर असे होत असेल, तर माझे अशिक्षित समाजबांधव कोणत्या परिस्थितीमध्ये जगत असतील? यावर ते गंभीर होत असत. यातूनच मग एका बंडखोरांचा जन्म झाला. या बंडखोरीतूनच शिक्षण संस्था, वृत्तपत्रे, सामाजिक संस्था निर्माण करीत राजकीय व सामाजिक चळवळी उभारून शोषितांच्या मनात बंडाच्या भावना निर्माण केल्या.
  
ज्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेब झगडले त्या व्यवस्थेचा उगम असलेल्या मनुस्मृतीला बेकायदा ठरवून नवीन व्यवस्था निर्मितीचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडेच जाते. डाक्टर आंबेडकरांच्यातील बंडखोर कधीही झोपी गेला नाही. केवळ कायद्याने बंदी करून अस्पृश्यता व वर्णव्यवस्था नष्ट होत नाही हे जेव्हा दिसले. तेव्हा  ती नष्ट करण्यास अत्यंत उतावीळ झालेल्या बाबासाहेबांना मग “मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषना करावी लागली. ते म्हणत, जो धर्म माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल, माझ्या मनाची पूर्ण खात्री करून देईल त्याच वेळी मी करून ठेवलेल्या धर्मांतराच्या नावेत माझ्या सात कोटी बांधवांना बसवून त्यांना अगदी सुरक्षितरीत्या पैल तीराला घेवून जाईल, आणि त्याचे जीवन स्थिरस्थावर करीन. पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी आपल्या कोट्यावधी अनुयायांना मानव मुक्तीचा नवा प्रकाश दिला. आधुनिक विवेकवादाने धार्मिक श्रध्देपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला तत्वज्ञानाच्या पातळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायांकडून होतो आहे.
बाबासाहेबांचे तिसरे मोठे धर्मांतर मुंबई येथे होवू घातलेले होते. परंतु त्याअगोदरच काळाने झेप घेत त्यांना बुद्धवास प्राप्त झाला. बाबासाहेब आज नसले तरी त्यांच्या विद्वतेचा आणि नैतिकतेचा फार मोठा वारसा सामाजिक परीवर्तनवाद्यासाठीमागे ठेवला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या बोधी विचारांचीशिदोरीच शोषितांचे उभे आयुष्य उजळवून टाकेल, माणूसम्हणून त्याला सन्मान मिळेल व शोषकाचे आक्रमण परतवून लावण्यास सक्षम आहे.
चैत्यभूमिवरील गर्दी म्हणजे वास्तव भारताचे प्रातिनिधिक रूप आहे. अभिवादन करण्यासाठी येणा-या गर्दीच्या शिस्तीची दखल सर्वानाच घ्यावी लागते परंतु या देशातील मुख्य वृत्तपत्रे व इलेक्ट्रानिक मिडिया या मोठ्या समूहाकडे पाठ फिरविताना दिसते. जातीयवाद व वर्णव्यवस्थेचा अहंगड हे त्यामागील कारण आहे. परंतु नाउमेद होतील असे आंबेडकरवादी कसे? आंबेडकरांच्या अनुयायांनी यावरही मात केली. त्यांनी विविध वर्तमानपत्रे (महानायक, सम्राट, लोकनायक), इलेक्ट्रानिक मिडिया केंन्द्रे ( लार्ड बुद्धा टीव्ही, आवाज इंडिया, महाबोधी चॅनेल) व अनेक पाक्षिके, मासिके चालवून परिवर्तनाच्या चळवळीत झोकून दिले आहे.
विवेकवाद, बुध्दिप्रामान्यता व विज्ञानवाद हा आंबेडकरी अनुयायांचा सकस आहारच असतो. भंपक धर्मवाद, अंधश्रद्धा, देवपूजा व मंत्रपठण अशा वाह्यात बाबी त्यांना रुचनारच कशा? आपले अशिक्षित बांधव हिंदू धर्मवाद्यांच्या अंध्दश्रध्देला बळी पडला याची जाणीव त्यांना आहेच. यातुनच २२ प्रतिज्ञा अभियानांसारखे प्रकल्प उभे राहिले. श्री अरविंद सोनटक्के सारखे सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी चैत्यभूमीवरमनगटाभोवती पांढरे धागे गुंडाळने, विभूतीपुजा, गळ्यात साई व इतर देवाची प्रतीके लटकाविना-या अशिक्षित बांधवांचे प्रबोधन करीत गंडदोरे व गळ्यातील तोडतात व त्यांचे सार्वजनिकरित्या दहन केल्या जाते. बहुजन समाजातील अंधश्रद्धा घालविण्याचे कार्य आंबेडकरांच्या विचाराच्या प्रयत्नातूनच होत आहे.
मनुष्याला जीवनात खरे सुख, समाधान व मुक्ती मिळवायची असेल तर ती बौध्द धम्मातच मिळू शकेल अशी ज्यांची खात्री झाली असे अनेक बुद्ध धम्मास शरण गेले. त्यात सुरेश भट, रुपा कुलकर्णी, लक्ष्मण  माने या सारख्या अनेक साहित्यिकांचा समावेश आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात जागोजागी धर्मांतरे झाली. २९ सप्टेंबर १९९० आग्रा येथे दोन लाख दलितांनी हिंदू धर्म त्यागून बौध्द धर्म स्वीकारला. आग्रा, मथुरा, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, अलीगढ़या १२ जिल्ह्यातील दलितांनी हे सामुहिक धर्मांतर केले. या धर्मांतराच्या स्फुर्तीमधून कानपुर येथे ५० लोकांनी १८ नोव्हेंबर १९९० बौद्ध धम्म स्वीकारला. छत्तीसगढ येथे हजारो सतनामी समुदायांनी १९९० मध्ये धम्म स्वीकारला. दक्षिण भारतात सुध्दा धर्मांतर गतिमान झाले. १९९० मध्ये  आंध्रप्रदेश मध्ये हजारो माला व मादिगा या जातींनी भिक्षु संघरक्षित यांच्या हस्ते बौध्द धम्म स्वीकारला. ४ नोव्हेंबर २००१ रोजी उदित राज यांनी ५० हजार दलितांना सोबत घेवून दिल्ली येथे धर्मांतर केले. जगात विपश्यनेच्या माध्यमातूनसुध्दा बुद्ध धर्माचे तत्वज्ञान व त्याच्या प्रसाराचे काम चालू असताना दिसते. देशात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या विपश्यनेचा प्रचार करून बुद्ध तत्वज्ञान जागृत करू पहात आहेत.
बाबासाहेब अस्पृश्य जनतेला उद्देशून म्हणाले होते, तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाहीत. मेंढरांचा कोणीही बळी देतो, वाघाचा कोणीही बळी देतो का? खाटेवर बसून चालणार नाही. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. हिंमतवान बना! तुम्ही दिव्याप्रमाणे स्वंयप्रकाशित व्हा. स्वत:वरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाचे अंकित होवू नका, सत्याला धरून रहा व दुसऱ्या कोणाला शरण जावू नका. तुम्हीच आपले आधार व्हा. स्वत:च्या बुद्धीला शरण जा, दुसऱ्या कोणालाही वश होवू नका. सत्यालाच शरण जा हा बाबासाहेबांचा उपदेश केवळ अस्पृश्याना नव्हे तर अखिल मानवजातीसाठीचा संदेश होता.
आज देशातील राजकारण, समाजकारण, धर्म, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये घडणा-या घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांच्या चिंध्या करणा-या घटना आहेत. बाबासाहेबांच्या नामाचा गजर करत बाबासाहेबांना नाकारण्याची स्पर्धा देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि धर्मक्षेत्रातही सुरू आहे. आजचा काळ हा लोकशाही,समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि सर्वकल्याणकारी स्वप्नांच्या हत्यांचा काळ आहे. माणसांची स्वप्ने मारली की माणसांना वेगळे मारण्याची गरज नसते. आजचा काळ हा स्वप्न मेलेल्या लाचारांचा, लोभ्यांचा आणि बेईमानांच्या बेसुमार गर्दीचा काळ आहे. एकावर एक संकटे आ वासून समोर उभे आहेत तरीही काहीजन दुस-यांची गुलामी करण्यात गर्क आहेत तर काही केवळ आपला इगो व आपले वेगळेपण शाबूत ठेवण्यासाठी दुकानदा-या मांडून बसलेले दिसतात. शहाणपणाच्याउजेडापासून फारकत घेवून त्यांनी आपले जनावरीकरणकायम ठेवले आहे. या अवस्थेमध्ये नव्या दमाच्या तरुण पिढीची प्रचंड घुसमट होतेय. देशभरात दलित समाजाबाबत घडत असलेली एकाहून एक अन्यायकारक प्रकरणं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावरही काहीही करू शकत नसल्याची चीड त्यांच्यात खदखदतेय. तरुणांच्या या घुसमटीचा उद्रेक या चैत्यभूमिवरून झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते क्रांतीच प्रेरणाकेंद्रच आहे. तेव्हा संपूर्ण विश्वच बघेल की, या दुकानदारांना आपापले दुकान बंद करण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. त्यासाठी चैत्यभूमिवरून पुन्हा एकदा संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाचे पुनर्जागरण होण्याची गरज आहे.