ज्या भूमीवर मानवाला मानवतेचे चैत्यन्य व स्फुलिंग मिळते,माणूस म्हणून समतेची मानवसेवा करायला प्रवर्ग होतो ती “चैत्यभूमी”. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दादर भागात विवेकवाद व विज्ञाननिष्ठा जपण्याचा मंत्र देणारी चैत्यभूमी. एक अशी भूमी जिथे दरवर्षी देश विदेशाच्या काना-कोपर्यातून आलेले लाखो लोक एका अनन्यसाधारण व्यक्तीला लहान मुलापासून तर आबालवृध्दा पर्यंत पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून अगदी शिस्तीमध्ये गंभीर व भारदस्त मनाने आदरांजली वाहतात तर दुसरीकडे काही काळ स्तब्ध राहून निळ्याभोर समुद्राच्या लाटा आदरांजली वाहत असतात. त्यातच भारताच्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंकदुरूनच दर्शन घेत त्यांना सलाम मारीत असतो.
जगातील एकमेव अशी व्यक्ती की जिच्यावर लाखो लोक स्तुतीसुमने वाहन्यासाठी एकत्र येतात, ती व्यक्ती म्हणजेडॉ.बाबासाहेब आंबेडकर. दादरच्या याच चैत्यभूमीवरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अग्नी संस्कार करण्यात आले. बौध्द संस्कृतीनुसार या स्थळावर एक चैत्य उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला ‘चैत्यभूमी’असे म्हणतात. ६ डिसेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती “जयभीम” चा नारा देत ‘बुध्दंम् शरणंम् गच्छामि’ च्या जयघोषात समर्पित होत असते. चैत्यभूमी आता केवळ भिमानुयायांच्या साठीचे आकर्षण केंद्र राहिले नसून ते बहुजनलाही वंदनीय झालेले आहे. देशविदेशातील अनेक मान्यवर मुंबईमध्ये येताच त्यांची पावले दादरच्या चैत्यभूमिकडे वळत असतात.
दादर परिसरातील प्रसिध्द पार्क म्हणजे “शिवाजी पार्क” होय. दरवर्षी ४ ते ६ डिसेंबर ह्या दिवसात शिवाजी पार्क हे “ज्ञानकेंद्र” बनलेले असते. डॉ. आंबेडकरांच्या समृद्ध वैचारिक वारशासोबतच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन विचारांचे प्रतिबिंब ठायी-ठायी उमटताना दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्व:साहित्यासोबतच इतर विद्वानांनी डॉ.आंबेडकर व त्यांच्या कार्यावर विविध भाषेतून केलेले भाष्य पुस्तकीरुपात बघायला मिळत असते. शेकडो पुस्तकांचे स्टॉल्स तसेच गीतांच्या सीडी जागोजागी दिसतअसतात. विविध संस्थांनी उभारलेल्या स्टॉल्समधून पत्रके व पुस्तिकाच्या माध्यमातून चैत्यभूमीवर येणा-यांना ज्ञानार्जीत करून माहितीपत्रकांचे विनामूल्य वाटप केले जाते. या ठिकाणी येणारा जनसमूह मूर्तीपूजक म्हणून येत नसतो तर तो येथून विवेकवाद, वैज्ञानिक जाणीवा, मानवतावाद, बुद्धिनिष्ठ तर्क व सत्याचा अर्क तसेच समाजपरिवर्तनाच्या चळवळीसाठी नवे विचार व त्याचा प्रसार करण्याच बळ तो घेवून जात असतो. आजचा बहुजनवाद, मुलनिवासीवाद, सत्यशोधक, अंधश्रद्धा व धर्मांधभक्ती विरोध आणि ब्राम्हण्याविरुद्धची सत्यवादी चळवळ हे त्याचेच अपत्य आहे.
शहरे व खेड्यातून डोक्यावर ओझे घेवून अनवाणी येणारे आबालवृध्द येतात तरी कशासाठी? असे आहे तरी काय या चैत्यभूमीवर? असा प्रश्न येथील प्रस्थापितांना नेहमी पडत असतो. या प्रस्थापितांना विस्थापितांचे जीवन कसे कष्टमय व अन्यायकारक असते याची मुळातच जाणीव नसते. ते केवळ दुस-यांच्या दु:खावर आपले सुखवस्तू जीवन चैनीमध्ये जगत असतात. अशांना बाबासाहेब म्हणजे आपले शत्रूच वाटत असतात. ज्या आबालवृद्धांनी ज्यांच्यावर आपल्या निष्ठा अर्पण केल्या ते बाबासाहेब होते तरी कोण? बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केल तरी काय? असे प्रश्न प्रस्थापितांच्या नव्या पिढीसमोर जरूर निर्माण होत असतील? अशांना बाबासाहेब सांगणे हे सुध्दा फार गरजेचे असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखी युगायुगातून एखादीच निर्माण होणारी व्यक्ती असते. संसदेमध्ये श्रध्दांजली देतानानेहरू म्हणाले, हिंदू समाजावरचा कलंक धुवून काढण्यासाठी संसदेने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे परंतु समाजाच्या हाडामासी खोल रुजलेली रुढी केवळ कायद्याने पूर्णपणे नष्ट होत नसते. परंतु बाबासाहेबांच्या तीव्र विरोधामुळे लोकांची मने या प्रकाराविषयी जागरूक बनलेली होती. डाक्टरांनी सात कोटी अस्पृश्यात एक अणुशक्ती व उर्जा निर्माण केली. आचार्य अत्रे म्हणतात त्याप्रमाणे, बाबासाहेब म्हणजे बंड, त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्रमूठ, आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्द असलेली भीमाची गदा, आंबेडकर म्हणजे जातीभेद व विषमतेवर सोडलेले सुदर्शन चक्र, आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख, आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधा-याच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्द. बाबासाहेबांनी, तथागत बुद्ध, संत कबीर व म. फुले हे तीन गुरुच मुळी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदाचे थोतांड माजाविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. बाबासाहेब सत्तेच्या व धर्माच्या जुलुमाला कधीच शरण गेले नाहीत. शरणागती त्यांच्या रक्तातच नव्हती, मोडेन, मार खाईन पण वाकणार नाही, असी त्यांची जिद्द होती ती त्यांनी खरी करून दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन रीतीने वागवितो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे ते हिंदू धर्मियांना बजावून सांगत. माणसासारख्या माणसांना अस्पृश्य बनविणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार असे त्यांनी सनातनी हिंदुना छातीवर हात मारून सांगितले होते. बाबासाहेबांच्या याच करारीपनामुळे हिंदुना आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षा हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत असे वाटत असे. आजही हिंदुत्ववाद्यांना बाबासाहेब म्हणजे कोणीतरी भयंकर असेच वाटते.
आचार्य दोंदे बाबासाहेबांना श्रन्दांजली वाहतांना म्हणतात, “जागतिक कीर्तीचा विद्वान” हा महान सन्मान पदरी बांधून भारतामध्ये जन्मास आलेली महान व्यक्ती. या विद्वानाला सुध्दा अनंत हाल सोसावे लागले. खेड्यापाड्यात बॅरीस्टरचे काम करायला निघाले, तर प्रवासात पाणी कोणी द्यायचे नाही, टांगेवाला टांग्यामध्ये घ्यायचा नाही. स्पृश्य समाजापैकी एखादा दुसराच क्लायंट त्यांना लाभायचा. त्यांना शाळेमध्येही प्रवेश मिळेना. मिळाला तर वर्गाच्या दारात त्यांच्यासाठी निराळे बाक, संस्कृत शिकवायचे नाकारल्यामुळे पर्शियन शिकावे लागले. नोकरीत स्पृश्य शिपायाकडून अपमान असे अनेक अपमान पचवून ते बाबासाहेब झालेत. ३१ मे १९३६ रोजी मुंबईमध्ये “मुक्ती कोण पथे” या विषयावर भाषण झाले. ते एका सामाज क्रांतीकारकाचे भाषण होते. साधना साप्ताहिक म्हणते स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेबांना कट्टर हिंदुत्ववादी वगळता इतर समाजगटात मानसन्मान प्राप्त झाला होता.
बाबासाहेबांचे स्थान कसे उच्च कोटीचे होते हे विदेशी वृत्तपत्रांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून प्राप्त होते. न्यूयार्क टाईम्स आपल्या भावना व्यक्त करताना लिहिते, डॉ. आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वतले. ते जगात सुप्रसिध्द होते. अस्पृश्य जगाचा धुरंधर म्हणून त्यांचा जगातील गौरव विशेष महत्वाचा होता. अस्पश्य समाजात जन्म घेतल्यानंतर त्यांना अत्यंत बिकट परीस्थितीमधून जगावे लागले. परंतु डॉ. आंबेडकरांनी या परिस्थितीलाही आव्हान दिले होते. नैसर्गिक व परिश्रमपूर्वक मिळविलेली बुद्धिमत्ता असल्यामुळे अशा परिस्थितीला कसे आव्हान देता येवू शकते? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डाक्टर आंबेडकर होत. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याचा सर्वोत्कृष्ठ उपाय कोणता? याबाबत मोहनदास के. गांधी यांचेसोबत आंबेडकरांचे मतभेद झाले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की, आंबेडकरांचा अस्पृश्यांचे प्रश्न सोडविन्याबाबतचा दृष्टीकोन गांधीपेक्षा अधिक कायदेशिरपणाचा होता. भारताच्या शासनाचा कायदेशीर पाया मुख्यत: डाक्टर आंबेडकर यांनी बसविला. भारतीय घटनेचे आंबेडकरच खरेखुरे शिल्पकार होते. आंबेडकर जगातील एक महान व्यक्ती होती. ते आपल्यासभोवार असलेल्या परिस्थितीतून व साधनातून उत्कृष्ट मार्ग शोधीत असत. त्यांचे गांधीबरोबर एकमत झाले नाही आणि त्यांनी नेहरुचे मंत्रिमंडळ केवळ मतभेदानेच सोडले. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने वैशिष्ठपूर्ण दर्जाच्या प्रथा पाडल्या होत्या. आणि त्या प्रथेनुसार आंबेडकर सतत वागले. त्यांच्या अनेक महान कार्यांपैकी काही कार्यांना फळे यावयास वेळ लागेल. मात्र आंबेडकरांचा प्रभाव हा अपुर्वपणे भारतावर पडलेला आहे. त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपण आहे. (न्यूयार्क टाईम्स, इंटरनशनल ८.१२.१९५६)
लंडन टाईम्स बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हणते, भारतातील सामाजिक व राजकीय घटनांच्या कोणत्याही इतिहासात आंबेडकराचे नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्माच्या जातीव्यवस्थेमुळे अपमानस्पद वागणूक मिळाली. तरीदेखील आंबेडकरांनी बहुमानाचा व नेतृत्वाचा मार्ग बरोबर काढला. ते शरीराने व बुद्धीने फार मोठे होते. निश्चय व धैर्य ही जणू त्यांच्या चेहऱ्यावर लिहिल्याप्रमाणे दुग्गोच्चार होत होती. त्यांनी तिन्ही खंडामध्ये अध्ययन करून ज्ञान मिळविले होते. अमेरिकेतील न्यूयार्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र याचा दीर्घ अभ्यास केला. त्यांनी बॉन युनिव्हर्सिटीत देखील अभ्यास केला. लंडनच्या स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. त्यांचा अभ्यास इंडिया ऑफीस मध्ये चालत असे. आंबेडकरांची बुद्धी व लेखणी कामात सतत गर्क असायची. “कांग्रेस व गांधीनी अस्पृशांचे काय नुकसान केले” या नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये आंबेडकरांच्या चळवळीची संपूर्ण कथा आहे. त्यांनी पाकीस्तानावर ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे रुपयाचा प्रश्न, भारतीय भांडवलाची वाढ व विकास अशा अनेक महत्वाच्या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत. भारताची घटना देखील त्यांच्या लेखणीतून तयार झाली. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यानी अंगीकारलेली कामे चालविली होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा अविष्कार म्हणजे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा केलेला स्वीकार होय. ( दिनांक: ०८.१२.१९५६) तर मँचेस्टर गार्डियन बाबासाहेबांचा धन्यवाद देताना म्हणते, भारतीय बिगर मुसलमान पुढा-यापैकी ज्या मोजक्या पुढा-यावर गांधीजीचा प्रभाव कधीच पडू शकला नाही त्यापैकी डॉ.आंबेडकर एक प्रमुख होत. गांधीजींच्या विचारामुळे भारतातील जातीव्यवस्था तशीच पुढे सदासर्वकाळ राहील असे वाटत असे. हिंदू लोकांच्या हातात अस्पृश्य मानलेल्या समाजाचे भवितव्य सुरक्षित राहील असा आंबेडकरांना विश्वास वाटत नव्हता. हिंदुपैकी काहीजन तात्पुरते प्रगतीकारक व हितकारक असले तरी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांचे कल्याण त्यांचे हातून घडणार असे त्यांना सतत वाटत असे. म्हणूनच अस्पृश्य समाजाकरिता स्वतंत्र मतदार संघ असावा अशी अतिशय आग्रहाची मागणी आंबेडकरांनी केली होती. पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केल्यावर गांधीनी निकराचा उपवास आरंभला. डॉ. आंबेडकरावर गांधीच्या मित्राचे खूप दडपण आले व त्यामुळे आंबेडकरांना आपला मार्ग सोडणे भाग पडून गांधीचा जीव वाचविला. हिंदू लोकासबंधीचा आंबेडकरांना वाटणारा अविश्वास त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम राहिला. ते नुकतेच लाखो अनुयायांसह बौद्धजन बनले. अस्पृश्यतेविरुध्द आंबेडकरांनी प्रचंड लोकमत तयार केले, व त्या लोकमतामुळे, अस्पृश्यांच्या कल्याणाची दखल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर, नोकऱ्या व शैक्षणिक संस्था यामध्ये अस्पृश्य लोकांना खास व विशिष्ठ असे अधिकार प्राप्त झाले. (०७.१२.१९५६).
डाक्टर आंबेडकरांचे जीवन म्हणजे अखंड झगडा होता. अस्पृश्यतेचे चटके त्यांना लहानपणापासून खावे लागले. कुशाग्र बुद्धी असली तरी शाळेत, महाविद्यालयात, कोर्टात वा समाजात त्यांना अस्पृश्य म्हणून वागविले जात होते. सर्व प्रकारची लायकी व कर्तबगारी असतानाही केवळ जातीमुळेच आपणाला बाजूला सारले जात आहे. आपला अपमान होतो हे त्यांना समजत होते. माझ्याबाबतीमध्ये जर असे होत असेल, तर माझे अशिक्षित समाजबांधव कोणत्या परिस्थितीमध्ये जगत असतील? यावर ते गंभीर होत असत. यातूनच मग एका बंडखोरांचा जन्म झाला. या बंडखोरीतूनच शिक्षण संस्था, वृत्तपत्रे, सामाजिक संस्था निर्माण करीत राजकीय व सामाजिक चळवळी उभारून शोषितांच्या मनात बंडाच्या भावना निर्माण केल्या.
ज्या व्यवस्थेविरोधात बाबासाहेब झगडले त्या व्यवस्थेचा उगम असलेल्या मनुस्मृतीला बेकायदा ठरवून नवीन व्यवस्था निर्मितीचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडेच जाते. डाक्टर आंबेडकरांच्यातील बंडखोर कधीही झोपी गेला नाही. केवळ कायद्याने बंदी करून अस्पृश्यता व वर्णव्यवस्था नष्ट होत नाही हे जेव्हा दिसले. तेव्हा ती नष्ट करण्यास अत्यंत उतावीळ झालेल्या बाबासाहेबांना मग “मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषना करावी लागली. ते म्हणत, जो धर्म माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल, माझ्या मनाची पूर्ण खात्री करून देईल त्याच वेळी मी करून ठेवलेल्या धर्मांतराच्या नावेत माझ्या सात कोटी बांधवांना बसवून त्यांना अगदी सुरक्षितरीत्या पैल तीराला घेवून जाईल, आणि त्याचे जीवन स्थिरस्थावर करीन. पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी आपल्या कोट्यावधी अनुयायांना मानव मुक्तीचा नवा प्रकाश दिला. आधुनिक विवेकवादाने धार्मिक श्रध्देपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला तत्वज्ञानाच्या पातळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायांकडून होतो आहे.
बाबासाहेबांचे तिसरे मोठे धर्मांतर मुंबई येथे होवू घातलेले होते. परंतु त्याअगोदरच काळाने झेप घेत त्यांना बुद्धवास प्राप्त झाला. बाबासाहेब आज नसले तरी त्यांच्या विद्वतेचा आणि नैतिकतेचा फार मोठा वारसा सामाजिक परीवर्तनवाद्यासाठीमागे ठेवला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या बोधी विचारांचीशिदोरीच शोषितांचे उभे आयुष्य उजळवून टाकेल, माणूसम्हणून त्याला सन्मान मिळेल व शोषकाचे आक्रमण परतवून लावण्यास सक्षम आहे.
चैत्यभूमिवरील गर्दी म्हणजे वास्तव भारताचे प्रातिनिधिक रूप आहे. अभिवादन करण्यासाठी येणा-या गर्दीच्या शिस्तीची दखल सर्वानाच घ्यावी लागते परंतु या देशातील मुख्य वृत्तपत्रे व इलेक्ट्रानिक मिडिया या मोठ्या समूहाकडे पाठ फिरविताना दिसते. जातीयवाद व वर्णव्यवस्थेचा अहंगड हे त्यामागील कारण आहे. परंतु नाउमेद होतील असे आंबेडकरवादी कसे? आंबेडकरांच्या अनुयायांनी यावरही मात केली. त्यांनी विविध वर्तमानपत्रे (महानायक, सम्राट, लोकनायक), इलेक्ट्रानिक मिडिया केंन्द्रे ( लार्ड बुद्धा टीव्ही, आवाज इंडिया, महाबोधी चॅनेल) व अनेक पाक्षिके, मासिके चालवून परिवर्तनाच्या चळवळीत झोकून दिले आहे.
विवेकवाद, बुध्दिप्रामान्यता व विज्ञानवाद हा आंबेडकरी अनुयायांचा सकस आहारच असतो. भंपक धर्मवाद, अंधश्रद्धा, देवपूजा व मंत्रपठण अशा वाह्यात बाबी त्यांना रुचनारच कशा? आपले अशिक्षित बांधव हिंदू धर्मवाद्यांच्या अंध्दश्रध्देला बळी पडला याची जाणीव त्यांना आहेच. यातुनच २२ प्रतिज्ञा अभियानांसारखे प्रकल्प उभे राहिले. श्री अरविंद सोनटक्के सारखे सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी चैत्यभूमीवरमनगटाभोवती पांढरे धागे गुंडाळने, विभूतीपुजा, गळ्यात साई व इतर देवाची प्रतीके लटकाविना-या अशिक्षित बांधवांचे प्रबोधन करीत गंडदोरे व गळ्यातील तोडतात व त्यांचे सार्वजनिकरित्या दहन केल्या जाते. बहुजन समाजातील अंधश्रद्धा घालविण्याचे कार्य आंबेडकरांच्या विचाराच्या प्रयत्नातूनच होत आहे.
मनुष्याला जीवनात खरे सुख, समाधान व मुक्ती मिळवायची असेल तर ती बौध्द धम्मातच मिळू शकेल अशी ज्यांची खात्री झाली असे अनेक बुद्ध धम्मास शरण गेले. त्यात सुरेश भट, रुपा कुलकर्णी, लक्ष्मण माने या सारख्या अनेक साहित्यिकांचा समावेश आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात जागोजागी धर्मांतरे झाली. २९ सप्टेंबर १९९० आग्रा येथे दोन लाख दलितांनी हिंदू धर्म त्यागून बौध्द धर्म स्वीकारला. आग्रा, मथुरा, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, अलीगढ़या १२ जिल्ह्यातील दलितांनी हे सामुहिक धर्मांतर केले. या धर्मांतराच्या स्फुर्तीमधून कानपुर येथे ५० लोकांनी १८ नोव्हेंबर १९९० बौद्ध धम्म स्वीकारला. छत्तीसगढ येथे हजारो सतनामी समुदायांनी १९९० मध्ये धम्म स्वीकारला. दक्षिण भारतात सुध्दा धर्मांतर गतिमान झाले. १९९० मध्ये आंध्रप्रदेश मध्ये हजारो माला व मादिगा या जातींनी भिक्षु संघरक्षित यांच्या हस्ते बौध्द धम्म स्वीकारला. ४ नोव्हेंबर २००१ रोजी उदित राज यांनी ५० हजार दलितांना सोबत घेवून दिल्ली येथे धर्मांतर केले. जगात विपश्यनेच्या माध्यमातूनसुध्दा बुद्ध धर्माचे तत्वज्ञान व त्याच्या प्रसाराचे काम चालू असताना दिसते. देशात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या विपश्यनेचा प्रचार करून बुद्ध तत्वज्ञान जागृत करू पहात आहेत.
बाबासाहेब अस्पृश्य जनतेला उद्देशून म्हणाले होते, तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाहीत. मेंढरांचा कोणीही बळी देतो, वाघाचा कोणीही बळी देतो का? खाटेवर बसून चालणार नाही. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. हिंमतवान बना! तुम्ही दिव्याप्रमाणे स्वंयप्रकाशित व्हा. स्वत:वरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाचे अंकित होवू नका, सत्याला धरून रहा व दुसऱ्या कोणाला शरण जावू नका. तुम्हीच आपले आधार व्हा. स्वत:च्या बुद्धीला शरण जा, दुसऱ्या कोणालाही वश होवू नका. सत्यालाच शरण जा हा बाबासाहेबांचा उपदेश केवळ अस्पृश्याना नव्हे तर अखिल मानवजातीसाठीचा संदेश होता.
आज देशातील राजकारण, समाजकारण, धर्म, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये घडणा-या घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांच्या चिंध्या करणा-या घटना आहेत. बाबासाहेबांच्या नामाचा गजर करत बाबासाहेबांना नाकारण्याची स्पर्धा देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि धर्मक्षेत्रातही सुरू आहे. आजचा काळ हा लोकशाही,समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि सर्वकल्याणकारी स्वप्नांच्या हत्यांचा काळ आहे. माणसांची स्वप्ने मारली की माणसांना वेगळे मारण्याची गरज नसते. आजचा काळ हा स्वप्न मेलेल्या लाचारांचा, लोभ्यांचा आणि बेईमानांच्या बेसुमार गर्दीचा काळ आहे. एकावर एक संकटे आ वासून समोर उभे आहेत तरीही काहीजन दुस-यांची गुलामी करण्यात गर्क आहेत तर काही केवळ आपला इगो व आपले वेगळेपण शाबूत ठेवण्यासाठी दुकानदा-या मांडून बसलेले दिसतात. शहाणपणाच्याउजेडापासून फारकत घेवून त्यांनी आपले जनावरीकरणकायम ठेवले आहे. या अवस्थेमध्ये नव्या दमाच्या तरुण पिढीची प्रचंड घुसमट होतेय. देशभरात दलित समाजाबाबत घडत असलेली एकाहून एक अन्यायकारक प्रकरणं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावरही काहीही करू शकत नसल्याची चीड त्यांच्यात खदखदतेय. तरुणांच्या या घुसमटीचा उद्रेक या चैत्यभूमिवरून झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते क्रांतीच प्रेरणाकेंद्रच आहे. तेव्हा संपूर्ण विश्वच बघेल की, या दुकानदारांना आपापले दुकान बंद करण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. त्यासाठी चैत्यभूमिवरून पुन्हा एकदा संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाचे पुनर्जागरण होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment